8अ उतारा Online|8A Utara Online Maharashtra|जमिनीचा ८अ खाते उतारा कसा काढायचा

नमस्कार, आज आपण 8A (8अ) उतारा कसा पहावा आणि 8अ उताऱ्याबद्दल इतर महत्वाची माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुमचा संबंध हा ग्रामपंचायत त्याचबरोबर तलाठी कार्यालय या गावपातळीवरच्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याशी  येत असतो.

तेथे तुम्हाला तुमच्या जमिनीशी संबंधित अनेक महत्त्वाचे दस्तऐवज काढावे लागत असतात त्यामध्ये सातबारा, फेरफार, ८ अ उतारा ही महत्त्वाची कागदपत्रे आहेत. ही कागदपत्रे आपण पाहिलेच असतील त्याचबरोबर जमिनीच्या कामासंदर्भात ती तुम्ही काढली सुद्धा असतील. पण त्याचे फायदे काय आहेत तसेच त्यांच्यावर लिहिलेल्या अनेक मजकुरांचा अर्थ काय होतो यातील फरक सगळ्यांनाच माहीत असतो असे नाही.

आपणाला माहीतच आहे की सातबारा उतारा वरून आपणाला त्या जमिनीचा मालक कोण? त्याचबरोबर त्या जमिनीवरील कर्ज तसेच त्या जमिनीमध्ये कोणकोणती पिके घेतली जातात याबद्दलची संपूर्ण माहिती मिळते. ८ उताऱ्या बाबतची माहिती बऱ्याच जणांना नसते त्यामुळे आपण त्या संबंधित संपूर्ण माहिती पाहूया.

८ अ उतारा म्हणजे काय?

८अ उतारा म्हणजे गावामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मालकीची जमीन आहे याची माहिती देणारा उतारा म्हणजे ८अ उतारा होय. म्हणजे एखाद्या व्यक्तीची गावामध्ये एकापेक्षा जास्त ठिकाणी जमीन असेल तर त्या जमिनीची सर्व माहिती एकाच कागदावर म्हणजे ८अ उताऱ्यावर मिळू शकते. याच उताऱ्याच्या आधारे ग्रामपंचायत कर आकारणी करत असते.

८अ उताऱ्याचे फायदे

  • ८अ उतारा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना कर गोळा करण्यासाठी खूपच उपयुक्त असा दस्तऐवज आहे.
  • ८अ उताऱ्या द्वारे एकाच व्यक्तीच्या मालकीची वेगवेगळ्या गटात असलेली एकूण जमीन किती आहे हे कळते.
  • तुम्हाला जर एखाद्या गावात जमीन खरेदी करायची असेल तर ग्रामपंचायत नमुना ८अ उताऱ्यामुळे तुम्ही खरेदी करणार असलेल्या जमिनीची संपूर्ण माहिती मिळते. त्यामध्ये तुम्हाला जमिनीचे मालकी हक्क हे वैयक्तिक आहेत का सामूहिक तसेच जमीन नेमकी कोणाच्या नावावर आहे हे अगदी पारदर्शी पद्धतीने ८अ उताऱ्यावर समजते. त्यामुळे जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये या ८अ उताऱ्यामुळे फसवणुकीला आळा बसतो.
  • एखाद्या जमिनीवर तुम्हाला नवीन घर बांधण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर ८अ उतारा खूपच उपयोगी पडतो.

८ अ उतारा कुठे मिळतो?

८अ चा उतारा मिळवण्याचे एकूण दोन मार्ग आहेत. ते खालील प्रमाणे.

१. जमिनीचा ८अ उतारा तुम्ही तुमच्या गावातील गाव कामगार तलाठी कार्यालयातून घेऊ शकता. त्याचबरोबर घराचा ८ अ उतारा तुम्ही ग्रामपंचायत मधून मिळवू शकता. ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयातून हा उतारा घेण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात जावे लागते. तिथे जाऊन तुम्हाला या उताऱ्यासाठी २० रुपये शुल्क द्यावे लागते.

२. ८अ उतारा मिळवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे तो तुम्ही ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करून घेऊ शकता.

मोफत ८ अ उतारा डाऊनलोड कसा करायचा?

  • ८अ उतारा डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. 👇👇👇 https://bhulekh.mahabhumi.gov.in
Select division for 8a
  • सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला तुमचा विभाग निवडावा लागेल. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपति संभाजीनगर, नाशिक आणि अमरावती विभागांपैकी एक विभाग निवडा
  • त्यानंतर तुम्ही ८अ या बटणावर क्लिक करा.
  • नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल.
  • यानंतर तुम्ही तुमचा तालुका निवडा.
  • नंतर तुम्ही तुमचे गाव निवडा.
Select 8a option
  • त्यानंतर तुम्हाला  स्क्रीनवर खाते नंबर वर क्लिक करून त्या ठिकाणी तुमचा गट नंबर टाकावा लागेल. (गट नंबर माहित असल्यास)
  • त्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करा.
  • सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर ८अ उतारा पाहायला मिळेल जो तुम्ही फक्त माहितीसाठी वापरू शकता.
  • पण शासकीय कामकाजासाठी तुम्हाला ८अ उतारा डाऊनलोड करूनच घ्यावा लागेल.

८अ उतारा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला वर दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन तुमची माहिती भरून लॉगिन करावे लागेल. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करून तुमच्या जमिनीचा आठ अ उतारा डाऊनलोड करू शकता.

याचबरोबर तुम्ही डिजिटल स्वाक्षरी असलेला 8अ उतारा फक्त 15 रुपये नाममात्र शुल्क भरून डाउनलोड करावा लागेल. हा डिजिटल स्वाक्षरी असलेला 8अ उतारा सर्व सरकारी आणि कायदेशीर कामासाठी वैध आहे.

८अ उतारा कसा वाचायचा?

  • ८अ उताऱ्याच्या वरच्या बाजूस मालकाचे नाव, पत्ता आणि खाते क्रमांक दर्शवलेला असतो.
  • उताऱ्याच्या वरच्या बाजूला उजवीकडे गाव आणि जिल्ह्याचे नाव दर्शविलेले असते.
  • उताऱ्याच्या वरच्या बाजूस उजवीकडे उतारा काढल्याची तारीख दर्शवलेली असते.
  • उताऱ्यामध्ये प्रत्येक जमिनीचा गट नंबर आणि हिस्सा नंबर दर्शविलेला असतो.
  • उताऱ्यामध्ये जमिनीचा प्रकार दर्शविलेला असतो. जसे की शेत, मोकळी जागा इ.
8अ उतारा demo
  • जमिनीचे क्षेत्रफळ हे हेक्टर आणि चौरस मीटर मध्ये उताऱ्यावर दर्शवली जाते.
  • जमिनीचा जमिनीचा वार्षिक महसूल रुपयांमध्ये दर्शवला जातो.
  • जमिनीवर जर बांधकाम केले असेल तर त्या बांधकामाचा प्रकार आणि त्या बांधकामाचे क्षेत्रफळ दर्शवले जाते.
  • जमिनीवर जर कर्ज असेल तर त्या कर्जाची रक्कम आणि तारीख दर्शवली जाते.

अशा पद्धतीने तुम्ही ८अ उताऱ्याचे वाचन संक्षिप्त स्वरूपात करू शकता.

८अ उतारा आणि ७/१२ यामधील फरक

७/१२ उतारा हा केवळ एका गटापुरता मर्यादित असतो, म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीची एका गटात कितीही ठिकाणी जमीन असेल तर ती ७/१२ उताऱ्यावर दिसते.

याउलट जर ८अ उताऱ्या बाबत बोलायचं झाले तर, एखाद्या व्यक्तीची गावामध्ये एकापेक्षा जास्त गटात जमीन असेल तर ती संपूर्ण गटामधील जमीन ही ८ अ उताऱ्यावर एकत्रितपणे पाहायला मिळते.

अशा प्रकारे ८अ  उताऱ्याचा वापर ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्याकडून महसूल गोळा करण्यासाठी चांगल्या प्रकारे केला जातो. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ८ अ उताऱ्यावर त्या व्यक्तीच्या नावावर त्या गावांमध्ये असलेली सर्व जमीन एकत्रितपणे दाखवलेली असते.

वरील माहितीच्या आधारे तुम्ही ८अ उतारा म्हणजे काय? त्याचबरोबर त्याचे फायदे, ८अ उतारा कोठे मिळतो? डिजिटल स्वरूपात ८अ उतारा डाऊनलोड कसा करायचा? त्याचबरोबर त्याचे वाचन कसे करायचे? आणि सर्वात शेवटी म्हणजे ८अ उतारा आणि ७/१२ यामधील जो काही महत्त्वाचा फरक आहे तो आपण सदरच्या लेखातून सविस्तरपणे पाहिला आहे. आम्ही आशा करतो की तुम्हालाही माहिती नक्कीच आवडलेली असेल.

Leave a Comment