आपल्या देशाची ओळख ही प्रामुख्याने शेतीप्रधान देश म्हणून आहेत. येथील सुमारे ५५ टक्क्यापेक्षा जास्त लोक शेती या व्यवसायात गुंतले आहेत. 7/12 हा शेती संदर्भातील सर्वात महत्वाचा कागद आहे. शेती संबंधित कोणताही व्यवहार करायचा असल्यास त्या जमिनीचा संपूर्ण इतिहास आपणास माहीत असणे खूपच आवश्यक आहे. कारण शेती संबंधित कायद्यामध्ये वेळोवेळी त्या त्या सरकारकडून बदल होत गेले आहेत. म्हणूनच आपणास आपल्या जमिनीचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळापासून माहीत करून घेण्यासाठी जुना 7/12 उतारा पाहणे आवश्यक आहे.
जुने सातबारा फेरफार व खाते उतारे | Old Land Records
स्वातंत्र्यपूर्व काळातील आपल्या जमिनीची माहिती सातबारा फेरफार व खाते उतारे यांच्या स्वरूपात तहसील उपलब्ध आहेत. सरकारकडून ही माहिती आता ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली. यापूर्वी ही सुविधा राज्यातील फक्त 7 जिल्ह्यांपूर्ती मर्यादित होती. आता तिची व्याप्ती वाढवण्यात आली असून सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही सुविधा दिली जात आहे.
या सुविधे अंतर्गत महाराष्ट्रातील जमिनीचे १९५० पासूनचे कागदपत्रे Land Records डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत. तुम्ही जुने ७/१२ उतारे , फेरफार आणि ८अ उतारे पाहू आणि डाउनलोड करू शकता. हि जुनी कागदपत्रे शासकीय आणि कायदेशीर पुरावे असल्याने अत्यंत उपयुक्त आहेत.
सरकारकडून उपलब्ध करून दिलेले हे उतारे कसे पाहायचे याचीच माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.
जुने अभिलेख कसे पाहावे | Procedure to view old Land Records
- जुने अभिलेख काढण्यासाठी सर्वप्रथम आपणाला https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
- या ठिकाणी तुम्हाला e-Records या नावाचे एक पेज दिसेल.
- या पेजच्या उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडून शकाल.
- तुम्ही जर या अगोदर या वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर, तुम्ही तुमचा लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून या वेबसाईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.
- पण,जर तुम्ही नवीन नोंदणी करणार असाल तर तुम्हाला सर्वप्रथम इथे नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे.
- या माहितीमध्ये तुमचे संपूर्ण नाव त्यानंतर जेंडर, (मेल आहे की फिमेल) त्यानंतर राष्ट्रीयत्व आणि सर्वात शेवटी तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे.
- त्यानंतर तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती भरायची आहे. जसे तुम्ही कोणता बिजनेस करता किंवा नोकरी किंवा यापैकी काही वेगळे करता ते माहितीच्या स्वरूपात भरायचे आहे.
- नंतर तुमचा मेल आयडी आणि जन्मतारीख लिहायची आहे.
- तुमची वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर तुमच्या पत्त्याविषयीची माहिती सांगायची आहे.
- पत्त्याविषयीच्या माहितीमध्ये तुमच्या घराचा क्रमांक, मजला क्रमांक, इमारत किंवा घरावर काही नाव असेल तर ते लिहायचे आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचा Pincode टाकायचा आहे. Pincoad टाकल्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव आपोआप फॉर्मवर येईल.
- त्यानंतर पुढे तुमच्या गल्लीचे नाव, गावाचे नाव आणि तालुक्याचे नाव भरायचे आहे.
- ही सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी तयार करायचा आहे.
लॉगिन आयडी तयार करताना समजा तुम्ही Amit@1988 हा लॉगिन आयडी टाकला तर, त्या लॉगिन आयडी ची उपलब्धता तपासण्यासाठी तुम्हाला उपलब्धता तपासा या पर्यायावर क्लिक करून तो आयडी अस्तित्वात आहे की नाही हे पाहायचं आहे.
तो जर अस्तित्वात नसेल तर तुम्हाला नवीन आयडी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ४ ते ५ सोप्या प्रश्नांपैकी एका प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. त्यानंतर कॅप्च्या टाईप करून तिथे दिसणारे आकडे किंवा अक्षर पुढच्या कप्प्यात जसेच्या तसे लिहायचे आहेत.
- त्यानंतर सर्वात शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर वापर करता नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण केली तिथे क्लिक करा लॉगिन करण्यासाठी असा मेसेज येईल. त्यानंतर स्क्रीनवरील येथे क्लिक करा या शब्दावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- आता रजिस्ट्रेशन करताना टाकलेले युजरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्हाला परत लॉगिन करायचे आहे.
जुना सातबारा उतारा कसा पाहायचा | E-Records (Archived Documents)
- सातबारा उतारा पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जिल्हा निवडावा लागेल.
- त्यानंतर तालुका, गावाचे नाव आणि अभिलेखाचा प्रकार निवडायचा आहे
- नंतर गट क्रमांक टाकून सर्च या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर सर्च रिझल्ट या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित सात बाऱ्याची माहिती माहिती दिसते.
- सात बाऱ्याचे वर्ष आणि क्रमांक त्या ठिकाणी दिलेला असतो तुम्ही फक्त त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा सातबारा पाहू शकता.
- त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमचे कार्ट ओपन होईल त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यावर क्लिक करून डाऊनलोड सारांश या नावाचे एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल, इथे तुम्हाला तुमच्या फाईलची सध्यस्थिती उपलब्ध आहे त्या स्वरूपात दिली जाईल. त्या समोरील फाईल पहा या पर्यावरण क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही ज्या वर्षाचा सातबारा पाहणार आहात ते सातबारा पत्रक ओपन होईल.
- या पत्रकावरील खाली बाण असलेल्या चिन्हावर तुम्ही क्लिक केल्यानंतर ते डाऊनलोड होईल.
- त्यानंतर तुम्हाला ज्या वर्षाचा सातबारा उतारा पाहणार आहात तो सातबारा उतारा तुम्ही पाहू शकाल. यामध्ये जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल झाले आहेत ते कधी झाले आहेत याची संपूर्ण माहिती विस्तृत स्वरूपात दिलेली असते.
या ठिकाणी आपण सातबारा 7/12 उतारा कसा पाहायचा यासाठी आपण सातबारा उताऱ्याची निवड केली आहे. जर तुम्हाला फेरफार हवा असेल तर फेरफार, आठ-अ हवा असेल तर आठ-अ हा पर्याय निवडायचा आहे. अशाप्रकारे आपण जवळपास 58 प्रकारचे अभिलेख (58 Types Documents) या पद्धतीने आपणास उपलब्ध होऊ शकतात. आणि आपल्या जुन्या कागदपत्रांमध्ये किंवा दस्तऐवजामध्ये वेळोवेळी जे काही सरकारने कायदा द्वारे बदल केले आहेत ते आपण पाहू शकता.